नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला एक नवा विक्रम खुणावतो आहे. या स्पर्धेत ९० धावा जमवल्यास रोहित आयपीएलमध्ये आपल्या ५००० धावा पूर्ण करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना यांचा या विक्रमात आधीच समावेश झाला आहे.
आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लीगचा पाचवा सामना होणार आहे. त्यामुळे हा विक्रम रोहित आजच आपल्या नावावर करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सध्या ४,९१० धावाांसह तिसर्या स्थानावर आहे. विराट कोहलीने १७८ सामन्यात ३७.६८च्या सरासरीने ५४२६ धावा केल्या आहेत. तर रैनाने १९३ सामन्यांत ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.
याशिवाय, आयपीएलमध्ये २०० षटकार ठोकणारा रोहित चौथा खेळाडू बनू शकतो. हा टप्पा पार करण्यासाठी रोहितली अजून ६ षटकारांची आवश्यकता आहे. यापूर्वी ख्रिस गेलने ३२६, एबी डिव्हिलियर्सने २१४आणि महेंद्रसिंह धोनीने २०९ षटकार मारले आहेत.