नवी दिल्ली - भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांनी रिषभ पंतला फलंदाज म्हणून 'गुणवत्तेचा खजिना' असे म्हटले आहे. मात्र, यासोबतच त्यांनी रिषभची यष्टिरक्षक म्हणून 'पाळण्यातील मुला'सोबत तुलना केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला मालिका जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या रिषभ पंतचे त्याच्या फलंदाजीबद्दल नेहमीच कौतुक केले जाते. मात्र, यष्टिरक्षणाच्या कामगिरीत त्याच्यावर टीका केली जाते.
एका कार्यक्रमादरम्यान, किरमानी म्हणाले, "रिषभ पंत हा प्रतिभेचा खजिना आहे, तो एक नैसर्गिक पद्धतीने मोठा फटका खेळणारा खेळाडू आहे. परंतु यष्टिरक्षक म्हणून त्याला अजून बरेच काही शिकायचे आहे. मोठा फटका कधी खेळावा, हेसुद्धा त्याला शिकावे लागेल. यष्टिरक्षणासाठी मूलभूत तंत्राची आवश्यक असते, जे पंतकडे नाही. जेव्हा एखादा स्टंपजवळ उभा असतो तेव्हाच यष्टिरक्षकची क्षमता मोजली जाते.''
किरमानी म्हणाले, ''जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांविरूद्ध पंत चांगले यष्टिरक्षण करू शकतो, कारण आपल्याकडे पुरेसा वेळ असतो. चेंडूचा स्विंग आणि बाऊन्स पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता.'' किरमानी यांनी रिषभच्या फलंदाजीबाबतही भाष्य केले. रिषभने परिस्थिती पाहून खेळ केला पाहिजे, असे ते म्हणाले.
"पंतने ब्रिस्बेनमध्ये अतिशय संतुलित खेळी खेळली केली. असे अनेक प्रसंग होते, जेव्हा पंत भारताला जिंकवून देऊ शकला असता. परंतु त्याने आपली विकेट गमावली. चेन्नईमध्येही असेच घडले, जेव्हा एखादा फलंदाज ८० धावांच्या जवळ पोहोचतो, तेव्हा तो शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तुम्हाला जोखीम पत्करावी लागत नाही. मोठा फटका खेळणे हा आपला नैसर्गिक खेळ आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आपल्याला परिस्थितीनुसार खेळावे लागते. मला त्याची ऑस्ट्रेलियामधील खेळी आवडली, ती संतुलित होती. जिथे बचावात्मक खेळ आवश्यक होता, तिथे तो बचावात्मक खेळला आणि जिथे आक्रमक खेळाची गरज होती, तिथे तो मोकळेपणाने खेळला. त्याला प्रत्येक डाव असा खेळायचा आहे. हे सर्व त्याला अनुभवाने शिकता येईल. तो तरुण आहे आणि अजूनही शिकत आहे'', असेही किरमानी म्हणाले.
१९७६ ते १९८६ या काळात सय्यद किरमानी यांनी भारतासाठी ८८ कसोटी आणि ४९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८३च्या विश्वकरंडक विजयात ते भारतीय संघाचे सदस्य होते.