बंगळुरू - भारतीय संघाचा क्रिकेटपटू आणि आयपीएलच्या आगामी हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुलविषयी रेड बुलने माहितीपट (डॉक्युमेंट्री) बनवला आहे. या माहितीपटाला 'केएल राहुल - शट आउट द नॉईज' असे नाव देण्यात आले आहे.
लॉकडाउनपूर्वी, भन्नाट लय सापडलेल्या राहुलने आयपीएलमध्ये खुल्या मनाने नेतृत्व करणार असल्याचे सांगितले आहे. फेब्रुवारी महिन्यात रणजी करंडक उपांत्य सामन्यात खेळलेला राहुल म्हणाला, की त्याने निव्वळ दोन महिने फलंदाजी केली होती.
तो म्हणाला, "पहिली गोष्ट, मला वाटते, की आम्ही नव्याने सुरुवात करत आहोत. सात महिन्यांपूर्वी जे घडले ते आता महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटत नाही." लॉकडाउनपूर्वी, राहुलने टीम इंडियाकडून खेळताना भन्नाट कामगिरीचे प्रदर्शन केले होते.
''आम्ही जास्त क्रिकेट खेळून या स्पर्धेत आयपीएलमध्ये आलेलो नाही. जास्त क्रिकेट न खेळल्यामुळे क्रिकेटपटू थोडेसे चिंताग्रस्त आहेत. आयपीएलसारख्या स्पर्धेसाठी मी चिंताग्रस्त नाही, असे म्हणालो तर ते खोटे ठरेल. पण हे क्रिकेटचे आव्हान आहे. कोरोनाचे संकट येईल असे कोणालाही वाटले नव्हते", असेही राहुलने सांगितले.
कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह ही तीन यूएई शहरे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत लीगचे आयोजन करतील. गतविजेत्या मुंबईचा आणि लीगचा पहिला सामना १९ नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल.