साउथम्प्टन - कोरोनानंतर सुरू झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात मोठे विक्रम नोंदवण्यात आले.
पहिल्या सामन्यातील विक्रम -
- कोरोना व्हायरसनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ बनला आहे. या मालिकेमुळे तब्बल 117 दिवसानंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे.
- वेस्ट इंडीजच्या संघाने तब्बल 13 वर्षांनंतर परदेशात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. यापूर्वी, त्यांनी 2000 साली इंग्लंडविरूद्ध आणि 2007-08 ला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही कामगिरी नोंदवली होती.
- मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागणारा बेन स्टोक्स हा दुसरा कर्णधार बनला आहे. यापूर्वी, 2003 मध्ये मायकल वॉनला नेतृत्व करत असताना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
- विंडीजने फलंदाजीच्या दुसऱ्या डावात दोनशे किंवा त्यापेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवण्याचा विक्रमही रचला आहे. आतापर्यंत ते अशी कामगिरी करताना 55 वेळा विजयी झाले आहेत. तर 6 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
- बेन स्टोक्स हा कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा आणि 150 बळी घेणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजचे दिग्गज गॅरी सोबर्स यांनी 63 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता, तर स्टोक्सने 64 कसोटी सामन्यात ही कामगिरी नोंदवली.