नवी दिल्ली - भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवा सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत. राजकोटमध्ये या दोघांनी एका महिला कॉन्स्टेबलसोबत वाद घातला. जडेजा आणि त्याची पत्नी रिवा मास्क न घालताच कारने फिरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवा जडेजा रात्री ९च्या सुमारास कारने फिरत होते. त्यावेळी महिला कॉन्स्टेबल सोनल गोसाई यांनी त्यांना किसनपाडा चौक येथे अडवले. गोसाई यांनी त्यांच्याकडे वाहन परवानाची विचारणा केली असता दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादानंतर, गोसाई यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर रविंद्र जडेजा आणि रिवावर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
वरिष्ठ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविंद्र जडेजाने मास्क घातला होता, तर, रिवा मास्कशिवाय कारमध्ये होती. रिवा ही भाजप पक्षाची नेता आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६७४ तर, संक्रमणाची एकूण संख्या ७२१२० अशी आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत सर्वाधिक २८१२७ रूग्णांची नोंद झाली आहे. तर, मृत्यूंची संख्या १६३७ आहे.