दुबई - सनरायझर्स हैदराबादचा फिरकी गोलंदाज राशिद खान यंदाच्या आयपीएलमध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. दुबई येथे पार पडलेल्या आयपीएलच्या ४०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सला ८ विकेट्सने पराभवाचे पाणी पाजले. या सामन्यात राशिदने ४ षटकात २० धावा देत १ बळी घेतला.
या सामन्यापूर्वी, राशिद खानने त्याच्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीची नक्कल केली. सामन्यापूर्वी सराव करताना राशिदने मुरलीधरनच्या शैलीत काही चेंडू फेकले. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान हैदराबाद संघाने १८.१ षटकात केवळ २ विकेट्स गमावत १५६ धावा करत पूर्ण केले.
हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ८३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.