नवी दिल्ली - संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. १९८३मध्ये भारताला पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकवून देणार्या कपिल देव यांच्या जीवनावरील चित्रपट ८३च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत आहे.
मागील वर्षी १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, ही तारीख २५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. चित्रपट निर्मात्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करायचा नसल्याने अजून वाट पाहण्यात आली. '८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. या सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक प्रदर्शित झाले आहेत.
हेही वाचा - 'मुंबई'च्या खेळाडूने झारखंडकडून ठोकले ११ षटकार!
२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिल देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले.याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भूमिका -
माजी क्रिकेट कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, चिराग पाटील हा त्याचेच वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.