कोलकाता - भारतासाठी १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळलेला वेगवान गोलंदाज अशोक डिंडाला, बंगालच्या रणजी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रणजी करंडक स्पर्धेत डिंडाने प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याने, त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अशोक डिंडा बंगाल संघाकडून रणजी करंडक स्पर्धा खेळत आहे. मंगळवारी त्याने बंगाल संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक रणदेब बोस यांना शिवीगाळ केली. यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने डिंडावर शिस्तभंगाची कारवाई केली.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डिंडा प्रकरणात बंगाल असोसिएशनने तातडीने बैठक बोलवली होती. या बैठकीला डिंडा आणि प्रशिक्षक बोस यांनाही बोलवण्यात आले. बैठकीत डिंडाला बोस यांची माफी मागण्यास सांगण्यात आलं, तेव्हा डिंडाने माफी मागण्यास नकार दिला.
या प्रकरणात बंगाल असोसिएशने सांगितलं की, 'डिंडाने जर बैठकीत बोस यांची माफी मागितली असती, तर त्याला संघातून बाहेर करण्यात आले नसते. कारण आंध्र प्रदेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात डिंडा बंगालसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.'
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, संघाच्या सरावाआधी कर्णधार अभिमन्यु ईश्वर आणि प्रशिक्षक रणदेब बोस यांच्यात रणणितीवरुन चर्चा सुरू होती. तेव्हा डिंडाला प्रशिक्षक बोस हे आपल्याविषयी ईश्वरला काही सांगत असल्याचा संशय आला. तेव्हा त्याने बोस यांना खडेबोल सुनावले. हा वाद वाढत गेला आणि डिंडाने बोस यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर डिंडाला माफी मागण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, त्याने माफी मागण्यास नकार दिला.
हेही वाचा - भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० सामना पाहा, फक्त 'इतक्या' रुपयात
हेही वाचा - पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्याला दिलं 'खास' गिफ्ट