रोहतक ( हरयाणा ) - रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गोयल मागील २ वर्षांपासून आजारी होते. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राजेंद्र गोयल यांच्या निधनावर बीसीसीआयसह काही माजी क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला. तसेच गोयल यांच्या निधनाने एक महान लेग-स्पिनर भारताने गमावल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली.
गोयल हे वयाच्या ७५ वर्षीही क्रिकेट खेळाबाबत सक्रिय होते. ते शाळेच्या विद्यार्थांना क्रिकेटचे धडे देत होते. २० सप्टेंबर १९४२ साली हरयाणाच्या नरवाना येथे गोयल यांचा जन्म झाला होता. त्यांनी पटियाला, पंजाब, हरयाणा, आणि दिल्लीचे नेतृत्व केले.
गोयल यांनी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक ६३७ गडी बाद केले. इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप ६०० चा टप्पा गाठता आलेला नाही. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणीत त्यांनी ७५० गडी बाद करण्याचा कारनामा केला. पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.
गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात खेळताना, २५ पेक्षा जास्त गडी बाद करण्याचा कारनामा १५ वेळा केला. गोयल यांनी १५७ सामने खेळले. ५५ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी ५९ वेळा एका डावात ५ गडी तर १८ वेळा एका सामन्यात १० गडी बाद करण्याची किमया साधली.
हेही वाचा - होय..! मी दोन वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले - स्टिव्ह बकनर
हेही वाचा - वॉर्नर म्हणतो... विराटला डिवचणे म्हणजे अस्वलाशी पंगा घेण्यासारखे