नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ राजस्थान रॉयल्स 1 ऑगस्ट रोजी एक माहितीपट (डॉक्यूमेंट्री ) मालिका प्रदर्शित करणार आहे. या मालिकेत संघाचा 2019 च्या हंगामाच्या मोहिमेचा प्रवास आहे. 'इनसाइड स्टोरी' नावाची तीन भागांची मालिका जिओच्या व्यासपीठावर प्रदर्शित होईल.
यात संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या मुलाखतींसह यापूर्वी कधीही न पाहिलेले व्हिडिओ समाविष्ट असतील. या माहितीपटात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, संजू सॅमसन आणि रियान पराग सारख्या स्टारसमवेत संघाचा मोसमातील प्रवास दाखवण्यात आला आहे.
या माहितीपटात, गुणतालिकेत संघाने सातव्या क्रमांकावर आपला प्रवास कसा संपवला हे दाखवले गेले आहे. गेल्या मार्चपासून या मालिकेवर काम सुरू होते.
गत सत्रात रॉयल्सने 14 पैकी पाच सामने जिंकले आणि 11 गुणांची कमाई केली. पहिल्या सहा सामन्यात ते फक्त एक सामना जिंकू शकले. बटलर, स्टोक्स आणि आर्चर संघात नसल्यामुळे संघ कमकुवत झाला होता. अजिंक्य रहाणेदेखील कर्णधारपदी अयशस्वी ठरला. मात्र, या हंगामात स्मिथला कर्णधारपदी नेमण्यात आले आहे.