मँचेस्टर - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे वेस्ट इंडीजने सुटकेचा श्वास घेतला आहे. हा सामना बरोबरीत सुटण्याची चिन्हे आहेत.
सकाळपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकही चेंडू खेळवता आला नाही. पहिले सत्र वाया गेल्यामुळे पंचांनी उपहाराची घोषणा केली. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिला. त्यापूर्वी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 1 बाद 32 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या सॅम करनने सलामीवीर जॉल कॅम्पबेलला 12 धावांवर माघारी धाडले. विंडीजकडून क्रेग ब्रेथवेट 6 आणि अल्झारी जोसेफ 14 धावांवर खेळत होते.
तत्त्पूर्वी, नाणेफेक जिंकून विंडीजने इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. यजमान इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला. बेन स्टोक्स (176) आणि डॉम सिब्ले (120) यांच्या 260 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभारली. द्विशतकाकडे कूच करणारा स्टोक्स चहापानानंतर 4 धावा काढून बाद झाला. त्याने 356 चेंडूंचा सामना करत आणि 17 चौकार आणि दोन षटकार टोलवत 176 धावा केल्या. तर, सिब्लेने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्याने 312 चेंडूत शतक पूर्ण केले. 1990 पासून इंग्लंडचे हे पाचवे संथ शतक आहे.