नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या नियुक्तीनंतर टीम इंडियाच्या फिल्डींग कोचसाठी एक नाव चर्चेत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे फिल्डींग कोच आर. श्रीधर यांची परत एकदा फेरनिवड होऊ शकते. सूत्रांच्या मते, त्यांना पुढील दोन वर्षासाठी नियुक्त करण्यात येऊ शकते. टीम इंडियाच्या फिल्डींग कोचसाठी जाँटी ऱ्होड्स आणि अभय शर्मा यांची नावे चर्चेत आहेत.

२०२१ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी राहणार आहे. सोबत कोचिंग स्टाफचा कार्यकाळही याच विश्वकरंडकापर्यंत असणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांच्या समितीमार्फत, कोचिंग स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे.
बीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, '२०२१च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री यांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर, परत एकदा मुख्य प्रशिक्षकाची निवड होईल. कारण, मोठ्या स्पर्धांसाठी हे गरजेचे आहे.'