नवी दिल्ली - आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर २ विकेट राखून थराराक विजय मिळवला. या विजयासह दिल्लीच्या संघाने क्वॉलिफायर-२ मध्ये आपले स्थान पक्के करत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. अंतिम फेरीसाठी दिल्लीचा आता सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
खेळल्या गेलेल्या या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत. दिल्लीचा संघ पराभवाच्या छायेत असताना पंतने दमदार फलंदाजी करत २१ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीत २ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या शानदार खेळीनंतर पंतचा संघसहकारी आणि दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने पंतवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
पृथ्वी शॉच्या मते, 'ऋषभ पंत हा सध्याच्या युवा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम फिनिशर आहे. आयपीएलमध्ये पंतची कामगिरी अत्यंत चांगली झाली असून अनेक वेळा तो दिल्लीच्या संघाचा तारणहार बनला आहे.' पंतने आयपीएलच्या या मोसमात १५ सामने खेळताना ४५० धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.