मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू प्रविण तांबे आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 'तांबे टी-१० लीगमध्ये खेळला असल्याने तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही', असे वृत्त बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.
हेही वाचा - 'कसोटी क्रिकेट म्हणजे चार दिवसाचं चादणं नव्हे', सेहवागनं दिलं आपलं मत
'भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील किंवा त्यांनी त्यापासून दूर राहावे आणि इतर देशांच्या लीगमध्ये खेळावे, असे बीसीसीआयच्या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे. टी-१० लीगमध्ये खेळणे आणि आयपीएलमध्येही सहभाग घेणे हे बीसीसीआयच्या नियमांच्या विरोधात असेल. त्यामुळे तो खेळू शकत नाही', असे या अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकाता नाइट रायडर्सने, १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात प्रविण तांबेवर २० लाखांची बोली लावत संघात घेतले. तांबे यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य राहिला आहे.
प्रविण तांबेने मागील वर्षी अबुधाबी आणि शारजाह येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्याने या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली होती. इयॉन मॉर्गन, केरॉन पोलार्ड आणि फॅबियन एलेन या खेळाडूंना त्यानं माघारी धाडलं. होते. महत्वाची बाब म्हणजे, त्यानं ख्रिस गेल आणि उपुल तरंगा यांनाही त्या सामन्यात बाद केले होते. तांबेने त्या सामन्यात २ षटकात १५ धावा देत ५ गडी बाद केले होते.