नवी दिल्ली - आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानकडे दिल्लीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर, हिम्मत सिंगला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) या स्पर्धेसाठी २२ सदस्यीय संघ जाहीर केला.
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या मर्यादित षटकांच्या मालिकेमुळे तो कदाचित स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यानंतर दिल्लीसाठी खेळू शकणार नाही. विजय हजारे करंडक स्पर्धा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा पहिला सामना मुंबईशी होणार आहे.
हेही वाचा - भारत-इंग्लंड दुसरी कसोटी : भारताने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार....
निवडकर्ते चेतन्य नंदा म्हणाले, "इंग्लंडबरोबर मर्यादित षटकांच्या मालिकेमुळे शिखर २८ फेब्रुवारीनंतर संघासोबत असणार नाही. प्रदीप हा अनुभवी खेळाडू आहे जो दिल्लीचे क्रिकेट चांगल्या प्रकारे समजतो." सांगवानने २०१७-१८च्या मोसमात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते.
दिल्लीचा संघ - प्रदीप सांगवान (कर्णधार), शिखर धवन, मनजोत कालरा, ध्रुव शोर, क्षितिज शर्मा, नितीश राणा, हिम्मत सिंग (उपकर्णधार), उन्मुक्त चंद, जॉन्टी सिद्धू, ललित यादव, सिद्धांत शर्मा, अनुज रावत (यष्टिरक्षक), लक्ष्या थरेजा ( यष्टिरक्षक), हितेन दलाल, कुंवर बिधुडी, वैभव कंदपाल, सिमरजित सिंह, शिवनक वसिष्ठ, शिवम शर्मा, व्हिजन पांचाल, कुलवंत खेजरोलिया आणि तेजस बरोका.