लाहोर - पेप्सी कंपनी 2021पर्यंत पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक म्हणून राहील, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी जाहीर केले. पाकिस्ताने संघाने पेप्सीबरोबरच्या कराराला वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत इंग्लंडला पाकिस्तान दौर्यावर 5 ऑगस्टपासून तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. याव्यतिरिक्त, पीसीबी झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकांचे आयोजन करेल.
पीसीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ''इंग्लंडच्या आगामी दौर्यावर पाकिस्तानची पहिली मोबाइल आर्थिक सेवा 'इझी पैसा' संघाचा सह-प्रायोजक असेल.'' याबाबत पीसीबीचे कमर्शिअल डायरेक्टर बाबर हमीद म्हणाले, ''पुढील बारा महिन्यांसाठी पेप्सी कंपनीने आमच्याशी करार केला आहे. 1990पासून ही कंपनी आमच्यासोबत आहे. कंपनीने आमच्याशी करार केल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.''
पकिस्तान आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना 5 ते 9 ऑगस्टदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येईल. तर, दुसरा कसोटी सामना 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाईल. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना साऊथम्प्टनच्या एजेस बाउल येथे खेळवला जाईल.
या मालिकेनंतर, दोन्ही संघात टी-20 मालिका पार पडणार आहे. हे तीन सामने 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरदरम्यान खेळवण्यात येतील.