लाहोर - कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या खेळाडूंची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणे, हे या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयोजित केलेल्या या सत्राचे उद्दीष्ट आहे.
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन विभागाच्या मदतीने पाकिस्तानच्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाद्वारे हे सत्र आयोजित केले गेले आहे. सध्याचे खेळाडू दिग्गजांच्या अनुभवांमधून बरेच काही शिकू शकतात.
जावेद मियांदाद, वसीम अक्रम, मोहम्मद युसूफ, मोईन खान, मुश्ताक अहमद, रशीद लतीफ, शोएब अख्तर आणि युनूस खान हे दिग्गज खेळाडू ऑनलाईन सत्रादरम्यान आपले अनुभव सांगतील. निवडकर्ता प्रमुख मिसबाह-उल-हक म्हणाला, “या दिग्गज क्रिकेटपटूंनी आपला अनुभव तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंसोबत वाटून घेण्यास सहमती दर्शवल्याचा मला आनंद झाला आहे. त्यांच्याकडे तरुण खेळाडूंसोबत सामायिक करण्यासाठी बर्याच चांगल्या कथा आणि अनुभव आहेत.”