कराची - सामना आणि स्पॉट फिक्सिंगच्या गर्तेत सापडलेला पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधून (पीएसएल) बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला आगाऊ रकमेचा धनादेश (अॅडव्हान्स पेमेंट चेक) त्वरित परत करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - IndvsNZ २nd Test : भारताचा पहिला डाव २४२ धावात आटोपला, विराट पुन्हा अपयशी
एका वृत्तसंस्थेनुसार, पीसीबीचे भ्रष्टाचारविरोधी पथक अकमलची चौकशी करत आहे. पीएसएलमध्ये अकमल क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळतो. नियमांनुसार लीगमध्ये भाग घेत असलेल्या प्रत्येक खेळाडूला एकूण कराराच्या रकमेपैकी ७० टक्के रक्कम आगाऊ म्हणून दिली जाते. उर्वरित ३० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर दिली जाते. अकमलला आगाऊ दिलेल्या ७० टक्के रकमेचा धनादेश परत करण्यास सांगितले आहे. हा धनादेश पीसीबीनेच दिला आहे. उमरच्या जागी क्वेटा संघाने अष्टपैलू खेळाडू अन्वर अलीला संघात स्थान दिले आहे.
पाकिस्तान बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम ४.७१ नुसार अकमल याला निलंबित केले आहे. अकमलवर याआधीच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता आणि त्याची चौकशी सुरू होती. यामुळे पीसीबीने ही कारवाई आली असल्याचे म्हटले जात आहे. पण या विषयी बोलण्यात पाकिस्तान बोर्डाने नकार दिला आहे.
२९ वर्षीय उमर अकमलने पाकिस्तानसाठी शेवटचा सामना मार्च २०१९ मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत १६ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत.