कोलकाता - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार या प्रश्नाची चर्चा नेहमीच रंगत असते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून रिषभ पंत हे नाव सर्वांसमोर असले तरी, त्याचा सध्याचा फॉर्म चांगला नाही. पंतच्या याच फॉर्मविषयी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने आपले मत दिले. शिवाय, वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यात सर्वोत्तम यष्टीरक्षक कोण? या प्रश्नालाही त्याने उत्तर दिले आहे.
हेही वाचा - तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना!
पार्थिवने युवा यष्टीरक्षक आणि सध्याच्या फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरलेल्या रिषभ पंतला पाठिंबा दर्शवला. एक-दोन डावामुळे त्याच्याविरुद्धची मते बदलू शकतात आणि त्याला आवश्यक आत्मविश्वास मिळू शकेल, असे पार्थिवने म्हटले आहे. पार्थिव सध्या रणजी करंडक स्पर्धेत गुजरातकडून खेळत असून गुजरात आणि बंगाल यांच्यात शुक्रवारी रंगणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
'जेव्हा टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्ता तुमच्याबरोबर असतील तेव्हा बाहेर जे बोलले जाते त्याने काही फरक पडत नाही. सध्याच्या क्षणी टिकून राहून स्वतःला सिद्ध करण्याची ही बाब आहे. तो चांगली कामगिरी करतोय त्यामुळे त्याच्यावर चर्चा होत आहे. शेवटच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यात कौशल्य आहे आणि संघ त्याला आवश्यक आत्मविश्वास देत आहे', असे पार्थिवने म्हटले.
पार्थिवला विकेटमागे सर्वोत्कृष्ट कोण आहे असे विचारले असता तो म्हणाला, 'सध्याच्या घडीला वृद्धिमान साहा जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर आहे यात शंका नाही. तो मैदानावर ऊर्जा घेऊन उतरतो.'