नवी दिल्ली - पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह भारतीय कर्णधार विराट कोहलीविरूद्ध गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे. विराट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. नसीम आपल्या कारकिर्दीतील मोठ्या आव्हानांच्या प्रतीक्षेत आहेत. 10 फेब्रुवारी 2020 रोजी नसीमने बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. तेव्हा त्याचे वय 16 वर्षे 359 दिवस होते.
एका मुलाखतीत नसीमने आपल्या कारकिर्दीबद्दल सांगितले. तो म्हणाला, ''भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई नेहमीच खास असते आणि हे सामने एखाद्या खेळाडूला नायक किंवा खलनायक बनवू शकतात. आता हे सामने कमी होत असल्याने ते खास आहेत. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी खेळण्यास तयार आहे.''
तो पुढे म्हणाला, ''मला आशा आहे की मी भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी करू शकेन. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी आमच्या चाहत्यांना निराश करणार नाही. मी विराटचा आदर करतो पण मला त्याची भीती वाटत नाही.''
नसीम शहा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा चौथा पाकिस्तानी गोलंदाज आहे. मोहम्मद सामी, अब्दुल रझाक यांनी एकदा तर, वसीम अक्रमने दोनवेळा ही कामगिरी केली आहे.