नवी दिल्ली - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला अजून एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले आहे. सूत्रांच्या मते, डावखूरा वेगवान गोलंदाज वहाब रियाजनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
पाकिस्तानच्या एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रियाजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तसे कळवले आहे. रियाज सध्या कॅनडाच्या टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असून पाकिस्तानमध्ये परतल्यावर तो निवृत्तीची अधिकृत घोषणा करु शकतो.
३४ वर्षीय वहाब रियाजने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. नऊ वर्षाच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत त्याने पाकिस्तानसाठी २७ सामने खेळले असून ८३ बळी पटकावले आहेत. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने भारताविरुद्ध ४६ धावांत ५ बळी घेतले होते.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने मोहम्मद आमिरने निवृत्ती घेतल्यानंतर, वहाब रियाजच्या निवृत्तीची भविष्यवाणीस केली होती.