लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुध्द झालेल्या पराभवानंतर माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिली. पराभवानंतर मी निराश झालो होतो. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते, असे आर्थर यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने भारतावर एकदाही विजय मिळवलेला नाही. विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान, असे ७ सामने झाले आहेत. हे सातही सामने पाकिस्तानने गमावले आहेत. या विश्वकरंडक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी पराभव केला. यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी धक्कादायक खुलासे केला आहेत.
दक्षिण अफ्रिका संघाविरुध्द पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मिकी आर्थर यांनी सांगितले की, मागील रविवारी माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार आला होता. याचे कारण संघाचे वाईट प्रदर्शन हे होते. लगोपाठ झालेल्या पराभवानंतर माध्यमे संघाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असे मिकी आर्थरनीं सांगितले.
२००७ साली वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. पाकिस्तान संघ या विश्वकरंडक स्पर्धेत ६ सामने खेळला असून पाच गुणांसह गुणातालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.