लंडन - अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या 2019च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकावर नाव कोरले. इंग्लंडच्या या विजेतेपदाला आज एक वर्ष पूर्ण झाले.
ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर 14 जुलै 2019 रोजी खेळला गेलेला हा सामना सुपरओव्हरपर्यंत गेला होता. सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यानंतर सर्वाधिक चौकार-षटकारांच्या नियमांवर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आले. या नियमामुळे आयसीसीवर चौफेर टीका झाली. त्यानंतर या नियमांत आयसीसीने बदल केला.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून निर्धारित 50 षटकांत 8 गडी राखून 241 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत इंग्लंड 241 धावांवर बाद झाला. सामन्याच्या शेवटच्या 50व्या षटकात इंग्लंडला विजयासाठी तीन चेंडूत 9 धावांची गरज होती. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 2 धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. तो थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे पंचानी इंग्लंड एकूण 6 धावा दिल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
सुपरओव्हरमध्ये इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेम्स नीशम आणि मार्टिन गुप्टिल यांनीही प्रत्युत्तरात 15 धावा केल्या. त्यामुळे सुपरओव्हरही बरोबरीत सुटली.
'एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या गटसाखळीच्या सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर तो सामना टाय होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर, सुपरओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपरओव्हरही टाय झाली तर, पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपरओव्हर खेळवली जाईल', असे आयसीसीच्या नवीन नियमात ठरवले गेले आहे.