हॅमिल्टन - रोमांचक ठरलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात, रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली. दरम्यान, या विजयानंतर रोहित शर्माने आपल्या खेळीचे रहस्य सांगितले.
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, 'मी यापूर्वी सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केलेली नव्हती. जेव्हा मी सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात आलो, तेव्हा माझ्या मनात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पावित्रा घ्यायचा की एकेरी दुहेरीवर भर द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. पण, मी गोलंदाज चूक करण्याची वाट पाहत होतो. टीम साऊदीने चूक केली, तेव्हा मी त्याच्या चेंडूवर प्रहार केला.'
मुख्य सामन्यातील फलंदाजीदरम्यान मला आणखी काही काळ क्रिझवर थांबायला हवे होते. मी नॉर्मल होऊन फलंदाजी करु इच्छित होतो. पहिल्या दोन सामन्यात मला धावा करता आल्या नाहीत. यामुळे या सामन्यात मी माझं योगदान देऊ इच्छित होतो. आज जर सामना जिंकला तर आम्ही ऐतिहासिक मालिका जिंकणार होतो, ही गोष्ट आमच्या मनात होती. महत्वाच्या सामन्यात मला एक भरवशाचा खेळाडू म्हणून आपल्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यात मी यशस्वी ठरलो असल्याची, भावनाही रोहितने व्यक्त केली.
भारताला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये १८ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने दोन धाव घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर एक धाव मिळाली. तेव्हा केएल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर एक धाव मिळाली. शेवटच्या दोन चेंडूमध्ये जिंकण्यासाठी १० धावांची गरज होती.
रोहित शर्माने, तेव्हा साऊथीने टाकलेल्या ओव्हर पिच चेंडूवर लाँग ऑनला उत्तुंग षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला चार धावा हव्या असताना, रोहितने लाँग ऑफला चेंडू टोलावत सहा धावा वसूल केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - IND VS NZ : सुपर ओव्हरमध्ये भारताचा रो'हिट' विजय, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय
हेही वाचा - इरफानच्या 'त्या' कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली!