हॅमिल्टन - बांगलादेशविरुद्धचा पहिला टी-२० सामना न्यूझीलंडने ६६ धावांची जिंकला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ बाद २१० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला ८ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांची सुरूवात खराब झाली. यानंतर डेवॉन कॉन्वे आणि मार्टिन गुप्टील या दोघांनी डाव सावरला. गुप्टील ३५ धावा काढून बाद झाला. कॉन्वेने दुसरी बाजू लावून धरत आक्रमक फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारासह ९२ धावांची खेळी साकारली. त्याला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या बिल यंगने चांगली साथ दिली. यंगने ३० चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन फिलिप्सने १० चेंडूत २४ धावा चोपल्या.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. लिटन दास ४ धावा काढून बाद झाला. यानंतर बांगलादेशची गळती थांबलीच नाही. बांगलादेशचा संघाला १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. अफिफ हुसैन याने सर्वाधक ४५ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून इश सोढीने ४ गडी बाद केले. लॉकी फर्ग्युसनने २ विकेट घेतल्या. टीम साऊदी आणि हमीश बॅनेट यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. कॉन्वे सामनावीर ठरला.
हेही वाचा - IPL २०२१: रोहित ब्रिगेड दिसणार नव्या रुपात, मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च
हेही वाचा - IND VS ENG : मैदानावर पाय ठेवताच विराटने केला 'हा' विक्रम