नवी दिल्ली - आयपीएलमधील कोलकाता संघाचा माजी सलामीवीर ख्रिस लीन याने सोमवारी टी-१० लीगमध्ये आतषबाजी खेळी केली आणि आपला फॉर्म परत एकदा सर्वांच्या लक्षात आणू दिला. कोलकाताने लीनला डच्चू देऊन चूक केली, असे मत युवराजने मांडले होते. मात्र, लीननेच या प्रकरणावर भाष्य केले आहे.
हेही वाचा - गुलाबी चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होण्यासाठी करण्यात आलाय 'हा' उपाय
'कोलकाताने डच्चू दिल्याचे दु:ख नाही. आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे कोलकाताचे लक्ष्य आहे आणि त्यादृष्टीने प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम संघाची बांधणी करत आहे. लवकरच आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. त्याआधी चांगली कामगिरी केल्यास मला दुसर्या संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकेल', असे मत लीनने व्यक्त केले.
अबू धाबी येथे सुरू असलेल्या टी-१० लीगमध्ये लीनने मराठा अरेबियन्सकडून खेळताना ३० चेंडूत ९१ नाबाद धावा ठोकल्या. टी-१० लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीनने या खेळीत ९ चौकार व ७ षटकार ठोकले. दहा षटकांच्या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली असली तरी, या लीगमध्ये पहिला शतकवीर होण्यापासून त्याला वंचित रहावे लागले. लीनच्या या वादळी खेळीमुळे संघाला मोठा विजय मिळवता आला.
आयपीएल २०२० च्या लिलाव प्रक्रियेआधीच लीनला डच्चू मिळाला आहे. लीनला केकेआरने ९.६ कोटी इतक्या किमतीत खरेदी केले होते.