बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर बुधवारी दुपारी ३ वाजता खेळण्यात येणार आहे. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहे. एनगिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.
दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीय.आफ्रिकेच्या संघाने विश्वकरंडकात आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यांना ३ सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळवता आलाय. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सध्या आफ्रिकेच्या खात्यात ३ गुण असून ते आठव्या स्थानी आहेत.
न्यूझीलंडने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमधील ३ सामन्यात विजय मिळवला असून, भारताविरुद्धचा त्यांचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात ७ गुण असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.
न्यूझीलंडकडे रॉस टेलर, केन विल्यमसन, मार्टिन गुप्टीलसारखे संयमी खेळी करून संघाला विजयश्री मिळवून देण्यात माहीर असलेले फलंदाज आहेत. तर दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डू प्लेसिस, क्विंटन डि कॉक, कॅगिसो रबाडा आणि इमरान ताहिर यांच्याकडून क्रिकेटप्रेमींना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत सातवेळा भिडले असून यात न्यूझीलंडने ५ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर २ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला यश मिळाले आहे.
असे आहेत दोन्ही संघ
दक्षिण आफ्रिका - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अॅडेन मार्करम, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हाशिम अमला, रॅसी वॅन डर ड्यूसेन, डेविड मिलर, एंडिले फेलुकवायो, जेपी ड्यूमिनी, ड्वेन प्रिस्टोरियस, ब्युरोन हॅन्ड्रिक्स, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, इमरान ताहिर, तब्रिज शम्सी.
न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, मिशेल सँटेनर