वेलिंग्टन - न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर खेळलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा १ डाव आणि १२ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने ही मालिका २-० अशी जिंकली आहे. निर्भेळ यशानंतर न्यूझीलंडचा संघ कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियासह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा - मोठी बातमी..पहिल्या हिंदकेसरी मल्लाचे निधन
चौथ्या दिवशी सोमवारी वेस्ट इंडिजने ६ बाद २४४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात ३२९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या विंडीजला डावाने पराभव टाळण्यासाठी ८५ धावांची गरज होती. वेस्ट इंडिजचा संघ ३१७ धावांवर बाद झाला.
पावसामुळे खेळ थोडा उशीरा सुरू झाला पण न्यूझीलंडने सकारात्मक सुरुवात केली. दिवसाच्या चौथ्या षटकात वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर बाद झाला. होल्डरने ६१ धावा केल्या आणि जोशुआ डा सिल्वाबरोबर ८२ धावांची भागीदारीही केली. त्याला टीम साऊथीने बाद केले. अल्जारी जोसेफने दोन षटकार आणि तीन चौकारांसह २४ धावा केल्या. जोसेफला बाद करत साऊथीने सामन्यात सातवी विकेट घेतली. त्याच्या नावावर कसोटीत आता २९६ बळींची नोंद झाली आहे. न्यूझीलंडसाठी रिचर्ड हॅडली आणि डॅनियल व्हेटोरी यांनी कसोटीत ३०० बळींचा आकडा पार केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डा सिल्वाने ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नील वेगनरने त्याला बाद केले. शेवटचा फलंदाज शॅनन गॅब्रिएलला बोल्टने शून्यावर बाद केले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून बोल्ट आणि वॅगनर यांनी प्रत्येकी ३ तर साऊदी आणि जेमिन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या विजयामुळे न्यूझीलंडच्या संघाने ११६ गुणांची नोंद केली असून ते कसोटी संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये न्यूझीलंडच्या संघाने तिसरे स्थान मिळवले आहे.