मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धेचे आयोजन लांबणीवर टाकण्यात येत आहे. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रिमीअर लीग स्पर्धा पुढे ढकलत ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाच्या संघमालकांनाही उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, किंग्ज इलेव्हन संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी या बैठकीआधी, लोकांच्या जीवापेक्षा आयपीएल महत्वाचं नसल्याचे म्हटलं आहे.
एका क्रीडा वाहिनीशी बोलताना वाडिया म्हणाले की, 'जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न येत असतो, तिथे काही चालढकल करून चालणार नाही. आयपीएल रद्द करून लोकांचे जीव वाचवले तर ते योग्य ठरेल. कोणतीही दुर्घटना होण्यापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही चांगली, हे माझे मत आहे.'
परिस्थिती सुधारली की, आपण पुन्हा आयपीएल संदर्भात विचार करू. पण, आता सध्या आयपीलपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे, असेही वाडिया म्हणाले.
दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुधारेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. पण जर आयपीएल स्पर्धाच रद्द करावी लागल्यास, बीसीसीआयचे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील ५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून अमेरिकेसह जगातील बहुतांश देशांनी आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. भारतातही ८३ हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा - आता आयपीएल 'या' तारखेपासून, बीसीसीआयचा मोठा निर्णय
हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकले रणजीचे पहिलवहिले विजेतेपद