नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा ऑनलाइन होणार आहे. या सोहळ्यात विजेते खेळाडू २९ ऑगस्ट रोजी आपापल्या ठिकाणी लॉग-इन करतील.
क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी हे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असल्याने हा दिन क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले, की 'यंदाचा पुरस्कार सोहळा ऑनलाइन होईल. सरकारच्या सूचनेनुसार विजेत्यांची नावे समारंभ सोहळ्याच्या दिवशीच जाहीर करण्यात येतील.''
दरम्यान, गेल्या वर्षी दुर्लक्ष झाल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने यावर्षी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी गठीत केलेल्या निवड समितीने प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांच्या नावाची शिफारस केली आहे. १३ इतर प्रशिक्षकांच्या नावांचीही शिफारस केली गेली आहे.
राणा यांचे नाव गेल्या वर्षी इंडियन नॅशनल रायफल असोसिएशनने पाठवले होते. पण त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नाही. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्या राणा यांनी मनु भाकर, सौरभ चौधरी अनिश भानवालासारखे जागतिक दर्जाचे नेमबाज तयार केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉकी प्रशिक्षक रमेश पठाणिया, ज्युड फेलिक्स आणि वुशु प्रशिक्षक कुलदीप पठानिया यांची नावेही पाठवण्यात आली आहेत.
समितीने ध्यानचंद पुरस्कारासाठी १५ नावे पाठवली असल्याचे समजते. या समितीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग, माजी पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता, बॉक्सर वेंकटेशन देवराजन, क्रीडा भाष्यकार अनिश बटाविया आणि पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया यांचा समावेश आहे.