मुंबई - इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने भारताचा दिग्गज माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे कौतुक केले आहे. हुसेन म्हणाला, "सौरवने भारतीय क्रिकेट संघाला बळकट केले. जेव्हा तुम्ही त्याच्या नेतृत्वाखालील संघाविरूद्ध खेळता तेव्हा एका मजबूत संघाविरुद्धचा कठोर संघर्ष जाणवतो. कर्णधार म्हणून मी त्याचा खूप आदर करतो. कारण त्याने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणली."
हुसेनने भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला, "कोहली हा एक अतिशय स्पर्धात्मक खेळाडू आहे. जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा त्याला जिंकण्याची इच्छा असते आणि जिंकण्यासाठी तो उत्सुक असतो."
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार इयान मॉर्गनबाबत हुसेन म्हणाला, "मॉर्गन इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघासाठी एक उत्कृष्ट कर्णधार आहे. या संघाबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा संघ स्वतःला खुलेपणाने सादर करतो.''
हुसेन पुढे म्हणाला, "या संघाबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघनिवड. मर्यादित क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणारे जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, असे खेळाडू संघात आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मॉर्गन कर्णधार म्हणून खूप शांत आहे.''