दुबई - यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई-बंगळुरू सामन्याद्वारे आपल्याला दुसऱ्या सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये ही धमाकेदार ओव्हर झाली. बंगळुरूसमोर सुपर ओव्हरमध्ये ८ धावांचे आव्हान होते. जसप्रीत बुमराहने मुंबईच्या विजयासाठी खूप प्रयत्न केले. पण, विराटने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत सुपर ओव्हर आणि सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने बंगळुरुला फलंदाजीचे आमंत्रण दिले. अॅरोन फिंच-देवदत्त पडीक्कल या सलामीवीरांची अर्धशतके आणि एबी डिव्हिलियर्स-शिवम दुबेच्या शेवटच्या षटकांतील फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईसमोर २० षटकात ३ बाद २०१ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने ईशान किशन (९९) आणि कायरन पोलार्ड (नाबाद ६०) या फलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर बरोबरी साधली. या सामन्यात अनेक विक्रम आयपीएलच्या पुस्तकात नोंदवण्यात आले.
वाचा विक्रम -
- आयपीएलच्या इतिहासात जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरमध्ये तिसऱ्यांदा गोलंदाजी केली आणि पहिल्यांदा मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.
- मुंबई इंडिअन्सचा युवा खेळाडू ईशान किशन आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याआधी विराट कोहली आणि पृथ्वी शॉ ९९ धावांवर बाद झाले होते.
- बंगळुरू संघाने आयपीएलच्या इतिहासात दुसर्यांदा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. २०१३च्या आयपीएलच्या हंगामात त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.
- मुंबईने सुपर ओव्हरमध्ये ७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील सुपर ओव्हरमधील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फक्त २ धावा केल्या होत्या.