मुंबई - मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर राहुल चहर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याला आदर्श मानतो. शुक्रवारी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ षटकांची गोलंदाजी करत केवळ २१ धावा दिल्या. या सामन्यानंतर त्याने त्यांच्या गोलंदाजीच्या यशाचे गुपित सांगितले.
चहर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, शेन वॉर्न माझ्यासाठी एक आदर्श गोलंदाज आहे. जेव्हा मी ८-९ वर्षाचा होतो तेव्हा माझे काका मला त्याच्या गोलंदाजीची डीव्हीडी आणून द्यायचे. त्यातून मी गोलंदाजी कशी करायची हे शिकलो.
आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे श्रेय चहरने भारताचा माजी गोलंदाज जहीर खान आणि शेन बॉन्ड यांना दिले आहे. त्या दोघांनी राहुलला गोलंदाजीच्या काही टिप्स दिल्या. त्यामुळे तो यंदाच्या मौसमात चांगली कामगिरी केल्याचे चहरने सांगितले.
१९ वर्षाच्या राहुल चहरने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना ८ सामन्यात ९ बळी घेतले आहे. मुंबईकडून सर्वाधिक बळी घेण्यात तो तिसऱ्या स्थानी आहे. या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने १९ धावा देत ३ गडी बाद केले. सध्या मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चेन्नईनंतर दुसऱ्या स्थानी आहे.