मुंबई - मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२० मधील २०व्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी ८ षटकार खेचले. यासह मुंबईचा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा संघ ठरला आहे. मुंबईने विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला.
मुंबईने आज पर्यंत १ हजार १५६ षटकार ठोकले आहेत. तर आरसीबीच्या नावे १ हजार १५२ षटकार आहेत. मुंबई आणि बंगळुरू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आहे. पंजाबने आतापर्यंत १ हजार ८ षटकार खेचले आहेत. चेन्नई १ हजार ६ षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. तर कोलकाता ९६२ षटकारासह पाचव्या नंबरवर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ (ही आकडेवारी आयपीएल २०२० मधील २०व्या सामन्यापर्यंतची आहे)
- मुंबई इंडियन्स - १ हजार १५६
- रॉयल चॅलेंजर बंगळुरू - १ हजार १५२
- किंग्ज इलेव्हन पंजाब - १ हजार ८
- चेन्नई सुपर किंग्ज - १ हजार ६
- कोलकाता नाइट रायडर्स - ९६२
- दिल्ली कॅपिटल्स - ९२१
- राजस्थान रॉयल्स - ७३६
- सनरायजर्स हैदराबाद - ५५१
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने १९४ धावांचे आव्हान राजस्थानसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल राजस्थानच्या संपूर्ण संघ १३६ धावात गारद झाला. महत्वाचे म्हणजे यातील ७० धावा एकट्या जोस बटलरने काढल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. बुमराहने चार गडी टिपले.