रांची - आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्र सरकारनेही या लीगला परवानगी दिली. यंदाचा हा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर असा असणार आहे. यंदाच्या आयपीएलसोबत चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाचीही उत्सुकता असणार आहे.
या लीगसाठी सर्व संघातील खेळाडूंनी वैयक्तिक सरावाला सुरूवात केली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (JSCA) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धोनीने सराव केल्याची माहिती मिळाली आहे. ''गेल्या आठवड्यात धोनी स्टेडियममध्ये आला होता. त्याने इन-डोअर सुविधांचा वापर करत सराव केला. त्याने बॉलिंग मशीनचा वापर करत फलंदाजी केली. शनिवारी-रविवारी त्याने फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर, तो परत येथे आला नाही'', असे असोसिएशनच्या व्यक्तीने सांगितले.
धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. तो या आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर एका वर्षानंतर पाऊल ठेवणार आहे. आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो यावरच त्याचे भारतीय संघातील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ही स्पर्धा धोनीसाठी खूप महत्वाची मानली जात आहे.
बीसीसीआयने २० ऑगस्टनंतरच संघांना युएईला जाण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, खेळाडू आणि संघ मालकांची कुटुंबे आयपीएल दरम्यान जैव-सुरक्षित वातावरणात राहतील.