कराची - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या मीडियांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सरफराज अहमदला 'डच्चू' देण्यात येणार आहे. पाकिस्तान निवड समिती एकदिवसीय, टी-२० आणि कसोटीसाठी वेगवेगळा कर्णधार निवडणार असल्याचे समजते.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली आहे. यामुळे सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार, अझहर अलीकडे कसोटीचे कर्णधारपद देण्यात येणार आहे. तर एकदिवसीय आणि टी-२० चे नेतृत्व अनुभवी मोहम्मद हाफिजकडे सोपविले जाईल.

कर्णधारपदावरून बाबर आझमची चर्चा रंगली होती. मात्र, बाबरला कर्णधारपदाचा अनुभव नाही. यामुळे त्याच्याऐवजी अनुभवी ३९ वर्षीय मोहम्मद हाफिजच्या नावाला पसंती मिळाली असल्याचे समजते. २०१७ चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर सरफराजचे नेतृत्व कमकुवत ठरले. विश्वकरंडक स्पर्धेत सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर घरच्या मैदानावर दुबळ्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा टी-२० मालिकेत ३-० ने पराभव केला. यामुळे सरफराजच्या कर्णधारपदावर टांगती तलवार आहे.
हेही वाचा - Karwa Chauth 2019: विराटने ठेवला अनुष्कासाठी उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ
हेही वाचा - IPL 2020 : पहिल्यांदा घडलं! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश