नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरात घुसून राडा केल्याप्रकरणी पत्नी हसीन जहाँला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र विचारपूस करून काही काळाने तीला सोडून देण्यात आले.
हसीन रविवारी रात्री उशीरा उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील सहसपूर गावातील मोहम्मद शमीच्या घरी गेली होती. मात्र शमीच्या घरच्यांनी तीला घरातून बाहेर जायला सांगितले. मात्र हसीनने स्वत:ला आणि आपल्या मुलांना एका खोलित बंद करून घेतले. यानंतर हा राडा सोडवण्यासाठी पोलिसांना शमीच्या घरी जावे लागले. मात्र तेथे वाद न सुटल्याने पोलिसांनी हसीन जहाँला ताब्यात घेतले होते. मात्र काही काळानंतर तीची जामीनावर सुटका करण्यात आली.
या सर्व नाट्यानंतर हसीनने मीडियाशी बोलताना सांगितले की, 'मी माझ्या पतीच्या घरी आले होते. मला तिथे जाण्याचा आणि राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र माझ्या सासरच्यांनी माझ्यावर अन्याय केलाय. असे असतानाही पोलिसांनी शमीच्या घरच्यांचेच समर्थन केले असून मला ताब्यात घेतले.'
शमी सध्या आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळत असून आगामी वनडे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातही त्याचा समावेश करण्यात आला आहे.