नवी दिल्ली - 'भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा उपांत्य सामना आम्ही अन्य सामन्यांप्रमाणेच खेळू', असे पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा सलामीवीर मोहम्मद हुरैराने म्हटले आहे. आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला सहा विकेट्सनी पराभूत केले. या सामन्यात हुरैराने ७६ चेंडूत ६४ धावा केल्या.
हेही वाचा - पुण्यात खेळणार लिएंडर पेस शेवटची स्पर्धा!
पाकिस्तानसोर आता उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ फेब्रुवारीला हा सामना पार पडेल.
शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर हुरैरा म्हणाला, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच स्पर्धा असते. थोडासा दबाव असेल, पण आम्ही याचा सामना करू. आम्ही इतर सामन्यांप्रमाणे हा सामना खेळण्याचा प्रयत्न करू. आम्ही फार उत्सुक आहोत.'
तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद १५९ धावा करू शकला.