लाहोर - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने अचानक निवृत्तीची घोषणा केली. संघ व्यवस्थापकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून ही निवृत्ती घेत असल्याचे आमिरने सांगितले होते. मात्र, याच निवृत्तीतून त्याने यू-टर्न घेतला आहे.
हेही वाचा - तब्बल ७५३ सामन्यानंतर मेस्सीसोबत घडली 'ही' घटना
मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि सध्याच्या संघ व्यवस्थापकांना हटवल्यानंतर पुन्हा क्रिकेट खेळू शकणार असल्याचे आमिरने सांगितले. यापूर्वीच कसोटीतून निवृत्त झालेल्या आमिरने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर 'मानसिक छळ' केल्याचा आरोप करत गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
सध्याच्या पीसीबी व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली खेळायचे नसल्याचे आमिरने म्हटले होते. मात्र, आमिर आता निवृत्तीनंतर यू-टर्न घेताना दिसत आहे. आमिर म्हणाला, ''नव्या संघ व्यवस्थापकांना नेमले गेले, तर मी मंडळाला या गोष्टीची माहिती देईल की मी राष्ट्रीय संघात निवड करण्यासाठी उपलब्ध आहे.''
मोहम्मद आमिरची कारकीर्द -
मोहमद आमिरने पाकिस्तान संघासाठी ३६ कसोटी, ६१ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण २५९ बळी आपल्या नावावर केले आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे आमिर खूप प्रसिद्ध राहिला आहे.
पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात आमिरने महत्वाची भूमिका बजावली. इंग्लंडमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१५मध्ये बंदी पूर्ण करून तो क्रिकेटमध्ये परत आला होता.