लाहोर - स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळून चूक केली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने म्हटले आहे. 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर आमिरला पाच वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
2016 मध्ये आमिर कसोटी क्रिकेटमध्येही परतला. पण ही चूक असल्याचे त्याने सांगितले. आमिरने यूट्यूब चॅनलवर सांगितले, "राष्ट्रीय संघात पुनरागमन केल्यानंतर मी तिन्ही प्रकारात खेळून मोठी चूक केली होती. भविष्यातील क्रिकेटपटूंना अशी चूक न करण्याचा सल्ला मी देईन. प्रत्येकाला आपली मर्यादा माहित असावी. पुनरागमनानंतर त्यांनी फक्त एक किंवा दोन स्वरूप खेळायला हवे. जर विश्वास असेल तरच त्यांनी तिसर्या स्वरूपात खेळावे.''
आपल्या दुसर्या मुलाच्या जन्मामुळे आमिरने सुरुवातीला इंग्लंड दौर्यापासून माघार घेतली. पण वेगवान गोलंदाज हारिस राऊफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आमिरला संघात बोलावले आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमिरने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या निर्णयामुळे कारकिर्दीत पाच-सहा वर्षे अधिक मदत होईल, असेही तो म्हणाला.