कोलंबो - इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला कोरोनाची लागण झाली आहे. मोईन अली यामुळे श्रीलंका दौऱ्यातील पहिली कसोटी खेळणार नाही, याची स्पष्टोक्ती इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी दिली.
श्रीलंका दौऱ्यासाठी आलेल्या इंग्लंड संघातील खेळाडूंची हंबनटोटो विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात मोईन अलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे त्याला १० दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मोईन अलीच्या संपर्कात आल्याने, ख्रिस वोक्सला देखील विलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण आता वोक्स विलगीकरणातून बाहेर आला आहे.
पण मोईन अली पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघात असण्याची शक्यता नाही, असे प्रशिक्षक सिल्वरवुड यांनी सांगितले.
सिल्वरवुड म्हणाले की, 'मोईन अली पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होणार नाही. कारण अजूनही तो विलगीकरणात आहे. त्याची प्रकृती बरी नाही. मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.'
दरम्यान, उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामन्याला १४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याला २६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यात चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत
हेही वाचा - गरज भासल्यास जडेजा इंजेक्शन घेऊन फलंदाजीला येणार