मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी १० वाजता देशाला उद्देशून भाषण करताना, लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी, ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम स्थगित होणार हे जवळपास निश्चित झाले. त्यामुळे आयपीएलच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यात देशातील लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार होता. यामुळे आयपीएल होईल, अशी चाहत्यांशी आशा होती. पण लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी मोदींनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगत त्याचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला. यामुळे आयपीएलचा जवळपास स्थगित होणार हे निश्चित झाले आहे.
लॉकडाऊनमुळे कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात येता येणार नाही. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुढील काही दिवस कडक नियम केले जातील असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. यामुळे बीसीसीआयला परदेशी खेळाडूसह आयपीएल खेळणे शक्य नाही.
तसेच सद्य घडीची स्थिती पाहता स्पर्धा स्थगित करण्याशिवाय कोणताच पर्याय बीसीसीआयकडे शिल्लक नाही. दरम्यान, बीसीसीआयकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा आज किंवा उद्या १५ एप्रिल रोजी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआय आयपीएल पुन्हा कधीपर्यंत स्थगित करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू
हेही वाचा - कोरोनामुळे पुनरागमनाच्या चूकीच्या आशा निर्माण करु शकत नाही – डिव्हिलियर्स