ब्रिस्बेन - मार्नस लाबुशेन (१८५) आणि डेव्हिड वार्नर (१५४) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ५८० धावांचे डोंगर उभारला. यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात ३ बाद ६४ धावा केल्या आहेत.
पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ २४० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५८० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३४० धावांची आघाडी घेतली असून पाकिस्तानला डावाने पराभव टाळण्यासाठी २७६ धावा कराव्या लागणार आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शान मसूद (२७) आणि बाबर आझम (२०) ही जोडी नाबाद आहे.
पहिल्या डावा पाठोपाठ दुसऱ्या डावातही मिचेल स्टार्क पाकिस्तानसाठी धोकादायक ठरला. त्याने तिसऱ्या दिवसाच्या एका तासाचा खेळ शिल्लक असताना पाकचा सलामीवीर अझहर अली (५) आणि हॅरिस सोहेल (८) यांना बाद केले. तर पॅट कमिन्सने असद शफिकला बाद करत पाकिस्तानला बॅकफुटवर नेले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि जो बर्न्स या जोडीने २२२ धावांची सलामी दिली. बर्न्स ९७ धावांवर यासिर शाहच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचित झाला. त्यानंतर लाबुशेन आणि डेव्हिड वार्नर या जोडीने ऑस्ट्रेलियाला तिनशे पार केले. वार्नर १५४ धावा काढून बाद झाला. त्याला नसीम शाहने रिझवानकरवी झेलबाद केले.
वार्नर पाठोपाठ स्टिव्ह स्मिथला यासिर शाहने ४ धावांवर माघारी पाठवले. तेव्हा लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या जोडीने शतकी भागिदारी रचत ऑस्ट्रेलियाला ४०० पार करुन दिले. हॅरिस सोहेलने वेडला (६०) बाद करत ऑस्ट्रेलियाला ४ था धक्का दिला. एका बाजूने ऑस्ट्रेलियाला गळती लागली. तेव्हा लाबुशनने १८५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५८० धावांवर आटोपला.
हेही वाचा - IND VS BAN : विराटची ऐतिहासिक शतकी खेळी, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - भारत-विडींज : टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात बदल, वानखडेवरील सामना 'या' ठिकाणी होणार