दुबई - फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पहिला सामना गमावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघासमोर आणखी अडचण निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. मार्शला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समजते. तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाल्यास, हा सनरायजर्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मार्शला अंतिम संघात संधी दिली होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्याला गोलंदाजी दिली. सामन्यातील पाचवे षटक टाकत असताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतू यात त्याला अपयश आले. अखेरीस विजय शंकरने मार्शचे उरलेले षटक पूर्ण केले होते. त्यानंतर मार्श फलंदाजीदरम्यानही, दहाव्या क्रमांकावर आला. यावरून त्याची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
मार्शची दुखापत गंभीर असून तो पुढील सामन्यांमध्ये खेळू शकेल याची खात्री नसल्याचे हैदराबाद संघातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मार्श स्पर्धेला मुकल्यास हैदराबाद संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे हैदराबादचे व्यवस्थापन मार्शच्या जागेवर डॅनिअल ख्रिश्चन किंवा मोहम्मद नबीला संघात स्थान देऊ शकते.
दरम्यान, स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर 10 धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करताना बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने 4 षटकांत 18 धावा देत सर्वाधिक 3 बळी मिळवले. त्याच्यासोबत शिवम दुबेने 3 षटकांत 15 धावा देत 2 बळी घेतले. तर नवदीप सैनी याने 2 आणि डेल स्टेन याने एक बळी मिळवला.
हेही वाचा - IPL 2020 RCB v SRH : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा 10 धावांनी विजय