कराची - सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच, पाकिस्तानतच्या प्रशिक्षकपदासाठी एक नाव पुढे आले आहे. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिसबाह उल हक नवीन प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान संघाला लाभण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मिसबाहचे नाव प्रशिक्षकपदासाठी पुढे आले आहे. त्याच्या नावाबरोबरच, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांचेही नाव चर्चेत आले आहे. ४५ वर्षीय मिसबाहने ७५ कसोटी आणि १६२ सामन्यात संघाची धूरा सांभाळली आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगनंतर, त्याने संघाला पुढे नेण्यात कामगिरी बजावली होती. २००७ च्या टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध मिसबाहने चूकीचा फटका खेळला होता. त्यामुळे पाकिस्तानला जेतेपद गमवावे लागले होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा करार वाढवण्यास नकार दिला आहे. बोर्डाने आर्थर यांच्या बरोबर सहसदस्य आणि कोचिंग स्टाफ, गोलंदाजीचे प्रशिक्षक अजहर महमूद, फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर, आणि ट्रेनर ग्रँट लूडेन यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तान संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले. त्याबरोबरच, २०१७ मध्ये भारताला हरवत चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावर केली होती.