बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जेव्हा होईल तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) संघ तयार असेल, असे आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी म्हटले आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता, परंतु कोरोनाच्या साथीमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
हेसनने क्रिकेटशी निगडित कार्यक्रमात सांगितले, "आपल्या सर्वांप्रमाणेच, आम्ही शिबिराचे आयोजन करण्यापासून फक्त एक आठवडा दूर होतो. आमची योजनाही तयार होती. सर्व काही थांबवणे हा योग्य निर्णय होता. अर्थात याक्षणी इतरही प्राथमिकता आहेत."
ते पुढे म्हणाले, “अजूनही आम्हाला आशा आहे की यावर्षी गोष्टी सुधारतील आणि आयपीएलचे आयोजन केले जाईल. तसे झाल्यास आरसीबी त्यासाठी तयार असेल असे मी आपणास आश्वासन देतो.”
विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु त्यांना एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही.