नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला एक विनंती केली आहे. लोकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नये, असे होल्डिंग यांनी आर्चरला सांगितले. दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी वेस्ट इंडिजबरोबर सुरू झालेल्या तिसर्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात आर्चर संघात पुन्हा परतला आहे.
"खरे सांगायचे तर, जोफ्रासाठी ते इतके कठीण असले पाहिजे असे मला वाटत नाही. कारण तो नुकत्याच कसोटी सामना जिंकलेल्या आणि आत्मविश्वासाने भरलेल्या इंग्लंड संघाचा एक भाग असणार आहे." असे होल्डिंग यांनी सांगितले.
होल्डिंग पुढे म्हणाले की, "इंग्लंड संघात जोफ्राचे बरेच मित्र असून तो बेन स्टोक्सच्या अगदी जवळचा आहे. तो एक अतिशय सकारात्मक व्यक्ती असून त्याने संघात व्यस्त रहावे आणि बाहेरील होणाऱ्या टीकेला विसरले पाहिजे. तरच तो एक उत्तम गोलंदाज होऊ शकतो."
यापूर्वी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर कोरोनाबाबत आखलेला प्रोटोकॉल तोडल्यामुळे आर्चरला सोशल मीडियावर वर्णद्वेषी वक्तव्याचा बळी व्हावे लागले होते.