मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे ६ गडी बाद झाले आहेत आणि यजमान संघाकडे अवघ्या २ धावांची आघाडी आहे. यादरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू वेड याने कौतूक केले. त्याने सांगितले की, भारतीय गोलंदाज चेंडू सरळ टाकत होते. यामुळे धावा करण्यास अडचण येत होती.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये रोखले. त्यानंतर ३२६ धावा करत पहिल्या डावात आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात देखील भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस आणले. अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कसेबसे १३१ धावांची बढत पार केली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ६ गडी बाद १३३ धावा केल्या आहेत. कॅमरुन ग्रीन १७ तर पॅट कमिन्स १५ धावांवर नाबाद खेळत आहे.
दुसऱ्या डावात १३७ चेंडूचा सामना करत ४० धावा करणाऱ्या मॅथ्यू वेड याने सांगितले की, 'भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. ते चेंडू सरळ रेषेत फेकत होते. यामुळे धावा जमवणे कठिण होते. आम्हाला भारतीय गोलंदाज थकल्याचा फायदा उचलता आला नाही. हे मान्य करावे लागेल. आम्ही संयमी खेळी करायला हवी होती.'
खेळपट्टीला दोष देणे चूकीचे आहे. कारण खेळपट्टी एकदम सपाट होती. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे देखील मॅथ्यू वेड म्हणाला.
हेही वाचा - ICC Awards : विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी
हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार