कटक - भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. विंडीजने पहिला सामना तर भारताने दुसरा सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना आज कटकच्या मैदानात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून विंडीजविरुद्ध सलग १० वी मालिका जिंकण्याच्या उद्देशानं खेळ करेल. तर विडींजच्या संघाला भारताला घरच्या मैदानात पराभूत करण्यासाठी संधी आहे. मात्र, विंडीजला अद्याप १३ वर्षांपासून भारतात मालिका जिंकता आलेलं नाही.
चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात आलेला मालिकेतील पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात, भारताने विंडीजचा १०७ धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत साधली.
तिसरा निर्णायक सामना आज कटकच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापत झाली. यामुळं तो हा सामना खेळू शकणार नाही. दीपकच्या ठिकाणी नवदीप सैनीचा समावेश भारतीय संघात करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयी लय भारतीय संघ कायम राखण्याच्या उद्देशानं आज खेळ करेल.
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर.
वेस्ट इंडीजचा संघ -
केरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंबरीश, शाय होप, खारी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पाल आणि हेडन वाल्श जूनियर.