लाहोर - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद-उल-हसन याने आपल्याच संघावर गंभीर आरोप केला आहे. राणा म्हणाला, ''2009 मध्ये युएईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत युनिस खानच्या नेतृत्त्वावर नाराजी असल्यामुळे बर्याच ज्येष्ठ खेळाडूंनी मुद्दाम खराब कामगिरी केली होती.''
''2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आम्ही दोन एकदिवसीय सामने गमावले होते. याचे कारण म्हणजे काही वरिष्ठ खेळाडू जाणूनबुजून चांगली कामगिरी करत नव्हते. मी खेळलो नाही कारण मी युनिसला सांगितले की त्याच्या विरुद्ध हे षडयंत्र आहे. युनुस खानविरूद्ध ही बंडखोरी नव्हती. तो एक चांगला क्रिकेटपटू होता. मी त्याच्याबरोबर खेळलो. पण कर्णधार झाल्यानंतर त्याचे वागणे बदलले'', असे राणा म्हणाला.
राणा पुढे म्हणाला, "मी या खेळाडूंची नावे घेणार नाही. परंतु तेथे काही ज्येष्ठ खेळाडू होते ज्यांना कर्णधार व्हायचे होते. ते आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणात गुंतले होते. या प्रकरणात आमच्या सात ते आठ जणांचा सहभाग होता. आम्हाला सर्वांना एका खोलीत बोलवण्यात आले आणि निष्ठेची शपथ देण्यात आली.''
राणाने पाकिस्तानकडून नऊ कसोटी, 74 एकदिवसीय आणि चार टी -20 सामने खेळले आहेत.